अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आपल्या गरोदर मुलीला माहेरी घेऊन जात असताना तिच्या आई-वडिलांवर जावयाने लोखंडी रॉडने हल्ला करून दुखापत केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला गणेशदिप चेमटे (वय 45, रा. मुंढे चौक, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
नीलेश अंकुश पालवे (रा. निर्मलनगर, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. चंद्रकला चेमटे यांची मुलगी भाग्यश्री सध्या दोन महिन्यांची गरोदर असून तब्येतीमुळे डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरूवारी (17 एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकला, त्यांचे पती गणेशदिप आणि वाहन चालक हे वाहन घेऊन भाग्यश्रीला माहेरी आणण्यासाठी नीलेश च्या घरी गेले होते. तिला माहेरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना नीलेश याने रागाच्या भरात शिवीगाळ केली.
त्यानंतर लोखंडी रॉड घेऊन त्याने वाहनाची दर्शनी काच फोडली आणि चंद्रकला यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. गणेशदिप यांनाही मारहाण केली. भांडण थांबवण्यासाठी पुढे आलेल्या भाग्यश्रीलाही नीलेशने ढकलून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.