पारनेर/ नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा, पारनेर या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवाचे सोमवार दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सहा महिन्यातून एकदा येणाऱ्या सोमवती अमावस्या उत्सव पर्वणीला श्री. खंडोबा दरबारी पौराणिक व धार्मिक महात्म्य आहे.
या सोमवती पर्वणीलाच देवाच्या उत्सव मूर्तींना पालखी मिरवणुकीने पवित्र गंगास्नानासाठी देवस्थान जवळीलच टाक्याचा दरा येथील बारावेवर नेण्यात येते. यावेळी हजारो खंडोबा भक्त देवाच्या पालखी पुढे लोटांगण दर्शन घेत नतमस्तक होतात. कुलधर्म कुलाचार करण्यासाठी सर्व खंडोबा भक्त घरातील टाक स्वरूपातील देवांना देव भेटीसाठी आणतात. देवाच्या उत्सव मूर्तीचे गंगा स्नानाच्या वेळी भक्त ही आपल्या सोबत आणलेल्या घरातील टाक स्वरूपदेवांना स्नान घालून तळी भंडारा करून श्री. खंडोबा देवाची देव भेट घेतात हा सोहळा खूप मनाला भावणारा असतो.
दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा. श्री. खंडोबा स्वयंभू मूर्ती मंगल स्नान पूजा, सकाळी ७ वा. खंडोबा अभिषेक, सकाळी ८ वा. मंदिरातील महाआरती सकाळी नऊ वा. देवाचे उत्सव मूर्तीचे सोमवती पर्वणीच्या पवित्र गंगा स्नानासाठी पालखी मिरवणूक प्रस्थान ढोल लेझींच्या तालात व खोबरे भंडाराच्या उधळणीसह येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात सकाळी ११ वा. पालखीचे टाक्याच्या दरा येथे आगमन, दुपारी १२ वाजेपर्यंत ब्रह्मवृंदाचे मंत्रघोषात उत्सव मूर्तीचे सोमवती पर्वणीचे गंगा स्नान संपन्न झाल्यावर सार्वत्रिक तळी भंडार करून महाआरती होईल. दुपारी १२ नंतर पालखीचे मंदिराकडे परत येण्यास प्रस्थान होईल.
दुपारी १२ वा. पासून सर्व भाविक भक्तांना सोमवती उत्सवानिमित्त खिचडी महाप्रसाद वाटप होईल. पिंपळगाव रोठा येथील जगताप, घुले, घोडके, खोसे, डावकर, मुंडे, शिंदे, झावरे, रणसिंग इत्यादी ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद नियोजन आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शनबारी, वाहने, पार्किंग यांचे नियोजन देवस्थान तर्फे आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी सोमवती पर्वणी उत्सवात कुलदेवताचे दर्शनाचा महाप्रसाद व पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे अध्यक्ष सौ. शालिनीताई अशोक घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, सरचिटणीस जालिंदर खोसे, खजिनदार तुकाराम जगताप, चिटणीस कमलेश घुले, विश्वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.