जालना / नगर सह्याद्री –
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाला मोठं यश आले. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. सरकारने सातारा गॅझेटसाठी वेळ मागितला आहे. आता मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी हैदराबाद गॅझेटनुसार काही प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी राज्यातील अनेक मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या. ‘आमच्याविरोधात खूप मोठा राजकीय डाव शिजतोय.’, असा संशय जरांगे यांनी व्यक्त केला.
हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रीट याचिका दाखल करा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, ‘त्याचं जाऊ द्या तिकडं, न्यायदेवता गोरगरिबांचा आधार असते. तो जीआर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे, त्यामुळे त्याला काहीच होऊ शकत नाही. त्याला जर होतंय तर 1994 चा जीआर राहूच शकत नाही. जे जे बोगस योजना खाते तेही राहू शकत नाही. 50 टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण देखील राहू शकत नाही.’
मनोज जरांगे यांनी भुजबळांवर सडकून टीका केली, ‘येवल्यावाल्याकडे ध्यान द्यायचं नाही, कारण तो पिवर नासका माणूस आहे. त्याला कोणाचं कल्याण व्हावं असं कधीच वाटलं नाही. सध्या विचित्र काम सुरू आहे. आमच्या काही लोकांच्या माध्यमातून खूप मोठा डाव रचण्याचे काम सुरू आहे. आम्हाला एकटं पाडायचं, उघडं पाडायचं, विनाकारण गैरसमज पसरवायचे हे काम त्यांच्याकडून चालू आहे. आमच्या विरोधात राजकीय खूप मोठा डाव शिजला जात आहे. त्याचा शोध आम्ही सुरू केला आहे.’
तुम्हाला जे लोकप्रतिनिधी पाठिंबा देत आहे त्यांना बघून घेऊ असं भुजबळ म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, ‘त्यांच्यामागे आम्ही आहोत ना, मराठे त्यांच्यामागे आहे त्याची काळजी करू नको तू. तुला समर्थन करणाऱ्याकडे आम्ही बघणार, तुला कळणं आमचा झटका कसा असतो तो. चांगल्या चांगल्यांचं राजकीय करिअर बरबाद करायची ताकद आमच्यात आहे.
जरांगेंनी आमच्याबाबत काही तरी डाव शिजत असल्याचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले की,’भुजबळ इतका मूर्ख माणूस आहे. हा ओबीसी आणि मराठ्यांच्या दंगली लावून मोकळा होईल. गरीब मराठ्यांनी संयम धरावा. गरीब ओबीसींनी देखील संयम धरावा. 100 टक्के काहीतरी मोठा डाव शिजत आहे . जीआर फक्त निमित्त आहे काहीतरी मोठा डाव शिजत आहे. यांना राज्यात काहीतरी घडून आणायचे आहे. राजकीय अजेंडा यांना राबवायचा आहे.’
शांतता राखा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता थोडी शांतता राखली पाहिजे. कारण सरकारची भूमिका स्पष्ट आहे पाहिल्यापासून ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. त्यामुळे ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ होण्याची गरज नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहेत. त्यांनाही माझी विनंती आहे की थोडं संयमाने पुढे गेले पाहिजे. बोलतानाही थोडी शांतता घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला कटुता टाळता येईल असे आवाहन मंत्री राधाकृष्णा विखेपाटील यांनी केले.



