सोलापूर / नगर सह्याद्री –
गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये प्रचंड नुकसान झालं. उंच इमारती कोसळल्या, मोठी वित्तहानी झाली आणि हजारो लोकांचा बळी गेला. या घटनेचे हृदयद्रावक व्हिडिओ अजूनही चर्चेत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सांगोला हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं समजतंय. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या भागात आज सकाळी 11:22 वाजता 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के काही क्षणांसाठीच होते, पण त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात सातत्याने सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भागातही अशा घटनांमुळे लोक हादरतात. सोलापूरच्या आजच्या भूकंपानंतर अनेकांच्या मनात लातूरच्या 1993च्या भीषण भूकंपाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. थायलंडच्या ताज्या घटनेनंतर आता सोलापुरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.