मोरया रे…. / शिवाजी शिर्के
कानठळ्या बसणवणाऱ्या डीजेच्या मुद्यावर थेट नाशिक विभागाचे आयजी असणाऱ्या दत्तात्रय कराळे यांना सुनावणारा बाप्पा आज काय बोलणार या विचारात मी कार्यालयात दाखल झालो. समोर बघतो तर साक्षात श्रीगणेशा!
मी- बाप्पा, आलास! आलाच आहेस तर इथे उभा का? सारे नगरकर ढोलताशांसह पारंपारीक वाद्यांनी तुझं स्वागत करत आहेत.
श्रीगणेशा- स्वागताचं सोड रे! त्या डीजेने कानठळ्या बसवल्यात!
मी- तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने तरुणाईला जोश येतो रे! दहा दिवसांचा तुझा उत्सव सर्वांनाच उत्साह आणि प्रेरणा देऊन जातो. ताणतणाव हलका होतो.
श्रीगणेशा- ताणतणाव हलका तुमचा होत असेल रे! पण, सामाजिक भान जपतंय का कोणी? नगर शहरात कधी नव्हे ती धार्मिक तेढ निर्माण झाल्याचं यावेळी जाणवतंय! जातीय सलोखा वाढीस लागावा यासाठी कोणी पुढाकार घेणार आहे की नाही?
मी- बाप्पा, कधीकाळी हे शहर दंगलीचं शहर म्हणून ओळखलं जायचं! गेल्या काही वर्षात दंगली झाल्याच नाहीत.
श्रीगणेशा- जातीय दंगली थांबल्या यात शंकाच नाही. त्याचे भांडवल करुनच काही निवडणुका झाल्या आणि त्यातून टाळूवरचे लोणी देखील खाल्ले गेले! गेल्या वर्षभरात नगरची वाटचाल मला वेगळ्या दिशेने चालू असल्याचे जाणवते रे!
मी- म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे?
श्रीगणेशा- नगरमध्ये हिंदुत्वाची लाट निर्माण झाली असल्याचे काही महिन्यांपासून मला जाणवत आहे. तुमचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा मुद्दा चेतवलाय! नगर शहरापुरते मर्यादीत असणारे हे नेतृत्व आता जिल्ह्यातील हिंदुत्वाच्या मुद्यावर पुढे आले आहे. राज्याच्या काही भागात त्यांना मागणी वाढलीय!
मी- बाप्पा, तू बोलतोय ते सारं खरं आहे! पण, त्यावर चर्चा करावी असे काय आहे?
श्रीगणेशा- चर्चा करण्यासारखीच बाब आहे रे! संग्राम जगताप हा तरणा आमदार ज्या राजकीय पक्षातून पुढे आलाय तो अजितदादांचा पक्ष कट्टर हिंदुत्वाची पाठराखण करणारा आहे का? मग, असे असतानाही संग्राम जगताप जाहीरपणे भूमिका घेतात आणि अल्पसंख्यांक समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाला ललकारताच कसे? विधानसभा निवडणुकीत त्यांना त्या भागात कमी मते मिळाली म्हणून ते नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच ते असे बोलतात असेही बोलले जाते.
श्रीगणेशा- तसे असेलही! मात्र, संग्राम जगताप यांचे वय आणि त्यांच्यातील आक्रमकपणा हेरुनच त्यांना थेट राज्यपातळीवर प्रोजक्ट केले जात आहे. निलेश राणे मंत्रीमंडळात असल्याने ते थेट बोलू शकत नाहीत! मग, कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलू शकणारा आणि थेट भिडू शकणारा तरुण आमदार म्हणून संग्राम जगताप यांना पुढे आणले गेलेय! देवेंद्र फडणवीसांपासून ते अजितदादा- एकनाथभाईंनीही त्यास सिग्नल दिलाय आणि त्यातूनच संग्राम जगताप हा तरुण आमदार थेट तळकोकणात जाऊन हिंदुत्वाची भूमिका मांडू लागलाय!
मी- बाप्पा, त्या गैर काय आहे?
श्रीगणेशा- मी कुठे म्हणतोय की त्यात गैर आहे! पण, हे सारे करत असताना सामाजिक सलोखा जपणं आणि दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. संग्राम जगताप तरुण आहे. तीनदा नगरकरांनी निवडून दिलंय त्यांना. त्यातून त्यांच्या विचारात प्रगल्भता आल्याचेही आता अधोरेखीत होत आहे. काय बोलायचं, कुठे बोलायचं आणि किती बोलायचं हे देखील त्यांनी ठरवून घेतल्याचं दिसतंय. मात्र, फार टोकाला जाऊन सामाजिक शांतता बिघडणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. नगर शहर विकासाच्या नव्या वळणावर त्यांनी आणलंय यात शंकाच नाही. संग्राम जगताप यांची कट्टर हिंदुत्ववादी तरुण आमदार म्हणून आता राज्यपातळीवर ओळख निर्माण होत आहे. नगरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. चल निघतो. पुन्हा भेटेलच, असं बोलून बाप्पाने निरोप घेतला आणि मी त्याच्या आगमनाच्या निमित्ताने कार्यालयातील आरतीसाठी सज्ज झालेले ताट हातात घेऊन उभा ठाकलो.