Politics News: महायुती सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात गोळा उठला आणि त्यांनी न्यायालयात योजनेवर आक्षेप घेतला. या योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना विधानसभा निवडणुकीमध्ये धडा शिकवा, असे आवाहन करत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला.
पाथर्डीच्या चिचोंडी येथे वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचे भूमिपूजन ना. विखे पाटील यांच्याहस्ते रविवारी झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले होते. यावेळी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, ज्येष्ठ नेते अॅड. सुभाषराव पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, रबाजी सुळ, पाथर्डी मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुभाष बर्ड, काशिनाथ पाटील, बाळासाहेब अकोलकर, उदयसिंह पाटील, सुरेश बानकर, दीपक कार्ले आदी उपस्थित होते.
वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामासाठी ९२ कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील दोन तर पाथर्डी तालुक्यातील दहा गावांतील ३३ पाझर तलावामध्ये पाईपद्वारे योजनेचे पाणी सोडले जाणार आहे. पुढील एक-दोन वर्षात या योजनेचे काम पूर्ण होणार असून वंचित राहणाऱ्या गावांचा टप्पा तीनमध्ये समावेश करून मुळा धरणातून वांबोरी चारीच्या पाण्याद्वारे हा भाग बागायती करू, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
नगर दक्षिण मतदारसंघाचा विकास २५ ते ३० वर्षांपासून रखडला होता. मात्र मी मतदारसंघात दहा हजार कोटी रुपयांची विकास कामे केली. त्यामुळे अनेक वर्षांचा रखडलेला विकासाचा आजार पाच वर्षात बरा केला. मात्र, त्याची चर्चा झाली नाही. उलट ती ३० ते ४० वर्ष डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन विकास नावाचा आजार, आहे तसाच ठेवणाऱ्यांना तुम्ही पसंती दिली. आता कर्डिले यांच्यासारख्या योग्य डॉक्टरला न्याय द्या, असे आवाहन केले.
मुळा धरणातून पाच वर्षात वांबोरी चारीरा भरपूर पाणी दिलं असं म्हणून विद्यमान आमदार या भागातील लाभधारक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. तिसगाव, मढी, मिरीपर्यंतचे अनेक पाझर तलाव कोरडेठाक राहिले. मात्र, विरोधकांनी पावसाने भरलेल्या तलावातील पाण्याचे जलपूजन केले. मढीपर्यंत पाणी देण्याचे काम केवळ माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनीच केले. ते ऊर्जामंत्री असतानाही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकले नाहीत. उलट शेतकऱ्यांकडून बीज बिल भरून घेण्यासाठी वारंवार शेती पंपाचा बीजपुरवठा बंद केला हे शेतकरी विसरलेले नाहीत, अशा शब्दांत माजी आ. कर्डिले यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी वांबोरी चारीच्या नावाखाली राजकारण केलं
१९९१ ला तत्कालीन मुख्यमंत्री जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी वांबोरी चारीच्या नावाखाली राजकारण केलं. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरू दिले नाही, या शब्दांत विखे पाटील यांनी निशाणा साधत, या भागातील जनता स्वाभिमानी असल्याचे स्पष्ट केले. महायुती सरकारने शेतकऱ्यांना शेतीपंपाचे वीज बिल माफ केले आहे. त्याचबरोबर दुधाला पाच रुपये नव्हे तर सात रुपयाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.