अहमदनगर | नगर सह्याद्री
मुलगी झाली म्हणून व कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंगरगण (ता. नगर) येथे माहेरी राहणार्या पीडित विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २८) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रशांत निवृत्ती शिंदे, सासू रंजना निवृत्ती शिंदे, सासरे निवृत्ती ठकुजी शिंदे, भाया विशाल निवृत्ती शिंदे (सर्व रा. गुंजाळवाडी ता. जुन्नर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार ७ सप्टेंबर २०२३ पासून ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी गुंजाळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीचा विवाह प्रशांत सोबत झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान पती प्रशांत, सासू रंजना, सासरे निवृत्ती, भाया विशाल यांनी मुलगी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता. तसेच कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेऊन ये असे म्हणून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी केली. मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला. मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार थोरवे करत आहेत.
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
माहेरहून एक लाख रूपये हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर शहरातील भुतकरवाडी परिसरात राहणार्या पीडित विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २८) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पती, सासू – सासर्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती शरद प्रकाश साठे, सासरे प्रकाश रत्नाकर साठे, सासू जयश्री प्रकाश साठे (सर्व रा. सातव वस्ती, खराडी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह शरद साठे सोबत झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना सासरच्यांनी त्यांना एक महिना व्यवस्थित नांदवले. त्यानंतर ३० मार्च २०२१ पासून पती शरद याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच सासरे व सासूने स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण केली. तसेच सासूने एक लाख रूपये हुंडा म्हणून मागितले. फिर्यादी ते देण्यास नकार दिला असता जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. मानसिक व शारिरीक त्रास देऊन उपाशीपोटी ठेऊन अपमानास्पद व क्रुरतेची वागणूक देऊन घराबाहेर काढून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तेव्हापासून पीडिता माहेरी आई – वडिलांकडे राहत असून त्यांनी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
विवाहितेला आत्महत्तेस प्रवृत्त केले, पती दिराविरूद्ध गुन्हा
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व दिराविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी अमोल ठाणगे (वय २१ रा. देहरे ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचा भाऊ दत्तात्रय शिवाजी कदम (वय २३ रा. मोकळओहळ ता. राहुरी) यांनी मंगळवारी (दि. २८) दुपारी फिर्याद दिली आहे. पती अमोल बाळासाहेब ठाणगे, दीर दीपक बाळासाहेब ठाणगे (दोघे रा. देहरे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी दत्तात्रय कदम यांची बहिण साक्षी यांचा विवाह सन २०२० मध्ये अमोल ठाणगे याच्याशी झाला होता. तेव्हापासून साक्षी सासरी देहरे येथे नांदत असताना पती अमोल व दीर दीपक यांनी त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख आणण्याचा तगादा लावला. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला. सदरचा प्रकार २७ मे २०२४ पर्यंत सुरू होता. शेवटी साक्षी यांनी छळाला कंटाळून २७ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्यापूर्वी राहत्या घरी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.