अहिल्यानगर | नगर सह्याद्री :-
कायदा व सुव्यवस्था राखताना काही वेळा लोक पोलिसांवर नाराज होतात, पण चांगले काम सुरू ठेवा. पोलीस खाते हे आपले कुटुंब आहे आणि त्यातच आपली ताकद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने चांगले काम केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दरम्यान, खाकी वदला डाग लागेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. चांगले काम करत असताना तक्रारी झाल्या आणि त्या पोलिसाचा हेतू शुध्द असेल, तर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील. मात्र चुकीच्या वर्तनाला माफी नाही असेे ते म्हणाले.
महानिरीक्षक कराळे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यावर आले होते. मंगळवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कवायत निरीक्षण करून मुख्यालयाची पाहणी केली. यानंतर आयोजित पोलीस दरबारात त्यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कुलबर्मे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार उपस्थित होते. यावेळी महिला व पुरूष पोलीस अंमलदारांनी खात्यात नोकरी करत असताना येणाऱ्या प्रशासकीय व वैयक्तिक अडचणी सांगितल्या. त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश महानिरीक्षक कराळे यांनी संबंधितांना दिले. सन 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
कोणतीही मोठी अनुचित घटना घडू न देता शांततेत निवडणुका पार पाडल्या. धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली गेली. याबद्दल महानिरीक्षक कराळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. पुढील काळातही पोलिसांनी हीच कामगिरी कायम ठेवावी, असे आवाहन केले. खाकी वदला डाग लागेल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. चांगले काम करत असताना तक्रारी झाल्या आणि त्या पोलिसाचा हेतू शुध्द असेल, तर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील.
मात्र चुकीच्या वर्तनाला माफी नाही. पोलीस दलातील तणावपूर्ण वातावरणामुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे नोकरी करत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असा महत्त्वाचा सल्ला विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी पोलिसांना दिला. आपण एकत्रित राहिलो, तरच अधिक बळकट होऊ, असे सांगत त्यांनी पोलीस दलाला एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
दरबारात महिला व पुरूष पोलीस अंमलदारांनी प्रशासकीय आणि वैयक्तिक अडचणी मांडल्या. वयाची अट ठेवून कवायतीसाठी नियम असावेत, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलिसांना कार्यमुक्त करावे, 10-20-30 वेतन फरक द्यावा, पोलीस बँड पथकाच्या मानधनात वाढ करावी, श्वान पथकातील पोलिसांना जोखीम भत्ता मिळावा यासारख्या विविध मागण्या अंमलदारांनी केल्या.
या तक्रारींची दखल घेत महानिरीक्षक कराळे आणि पोलीस अधीक्षक ओला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.पोलीस मुख्यालयातील मेसमध्ये यापूव पोलिसांना समाधानकारक जेवण मिळत नव्हते. मात्र, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या बाबींकडे लक्ष दिल्याने आता गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पोलीस अंमलदारांना चांगले जेवण मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल पोलीस अंमलदारांनी अधीक्षक ओला यांचे विशेष कौतुक केले.