Ahmednagar Crime: चौघांच्या नावाने एक चिठ्ठीत लिहत नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. संताराम मतकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी त्यांच्या पत्नीने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी ज्ञानेश्वर मतकर, भरत मतकर, सुनील वाणी (तिघे रा. पाचेगाव), डॉ. सुद्रिक (रा. सोनई) व देविदास काळे (रा. इमामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाची नावे आहे.
अधिक महिती अशी: दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून ८० फूट विहिरीतील पाण्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली होती.
घटनास्थळी दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या अवस्थेत मिळून आल्या होत्या. आता या प्रकरणात मोठी माहिती उजेडात आली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चिठीत घेतलेले कर्ज फेडूनही त्रास दिला जात असल्याच्या आशयाचा मजकूर असल्याचे समजते.
पत्नीने दिलेल्या फिर्यादीत काय?
मी पाचेगाव येथील रहिवासी असून मुलगा व पती असे आम्ही एकत्रित राहावयास होतो. मोठा मुलगा व सून चार वर्षांपासून पुणे येथे कंपनीत कामाला असून ते तिथेचे राहत आहेत. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी माझे पती नामे संतराम उनाजी मतकर यांनी आत्महत्या केली असून त्यावेळी त्यांनी एक चिड्डी लिहून ठेवली होती. पती संतराम उमाजी मतकर यांना व्याजाच्या पैशावरून नेहमी सनी ज्ञानेश्वर मतकर, भरत मतकर, सुनील वाणी (तिघे रा. पाचेगाव), डॉ. सुद्रिक (रा. सोनई) व देविदास काळे रा. इमामपूर हे सर्वजण त्रास द्यायचे म्हणून माझे पती यानी त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हंटले आहे.
घातपात तर नाही ना?; परिसरात चर्चा
संतराम मतकर याच्या आत्महत्येबाबत चिठ्ठीत काय होते. याचा उलगडा झाला असला तरी त्याला लिहिता- वाचता येत नव्हते अशीही चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्याला विहिरीत आत्महत्या करायचीच होती तर तो गळ्याला व हाताच्या मनगटाला दोरी कशासाठी बांधेल ? यामागचे रहस्य काय? काही घातपात तर नाही ना? अशीही चर्चा परिसरात होत आहे.