अहिल्यानगर । नगर सहयाद्री
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून एका विवाहित तरुणीचा व्हिडीओ गुपचूप रेकॉर्ड करून तिची बदनामी करण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून जुनेद शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची २ मे २०२५ रोजी इन्स्टाग्रामवर जुनेद शेख याच्याशी ओळख झाली. आपण विवाहित असून दोन मुलांची आई असल्याची माहिती दिल्यानंतरही जुनेदने गोड बोलून विश्वास संपादन केला. व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत असताना जुनेदने गुपचूप व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत जुनेदने सतत संपर्क ठेवण्यास भाग पाडले आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
विवाहितेने ही बाब पतीला सांगितल्यानंतर त्यांनी जुनेदशी संपर्क साधून त्रास देऊ नये, अशी विनंती केली. मात्र त्याने वर्षा आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची तसेच फोन केला नाहीस तर मुलांना ठार मारीन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.