अहमदनगर। नगर सहयाद्री:-
सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात हजेरी लावणार आहे. जिल्ह्यातील कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या विकासाच्या दहीहंडीची आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू असून गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी दिली.
दरवर्षी कोपरगाव शहरात होणारी राष्ट्रवादीची दहीहंडी प्रसिद्ध असून प्रत्येक वर्षी मुंबई सारख्या शहरात ज्याप्रमाणे दहीहंडी उत्सवाला सिनेकलाकार मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्याप्रमाणे कोपरगावात देखील दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवाला चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली. आ. आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकाळात मतदार संघात कोटींचा निघा आणला असून विकसित कोपरगाव म्हणून कोपरगाव मतदार संघाची वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे.त्यामुळे यावर्षीची दहीहंडी विकासाची असून आ. आशुतोष काळे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. त्यातच दहीहंडीमध्ये खास आकर्षण म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार आहे. कोपरगावात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या आपल्या सण उत्सवांपैकी अतिशय आनंद देणाऱ्या या दहीहंडी या उत्सवाचा तरुणाईसह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी केले आहे.