अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. गेल्या 40 वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी प्रलंबित आहे. 15 ऑगस्टपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरजिल्हा मुख्यालय करावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूरकर मागणीसाठी आंदोलन देखील करत आहे. दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीरामपूर जिल्हा करण्याची जबाबदारी घेतली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार असल्याचे जाहीर केले.
भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे होते. यावेळी सांगलीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, चंद्रशेखर कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले, “भौगोलिक दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ही काळाची गरज आहे. श्रीरामपूरच्या बाबतीत मी नेहमी हजर राहील आणि जिल्ह्याच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करीन.” “राजकारण बदलत चालले आहे, आणि काही वेळा तडजोडी कराव्या लागतात. भारतीय जनता पक्षात कुणावरही अन्याय होणार नाही,” असे ते म्हणाले.