अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी (5 फेब्रुवारी) सायंकाळी घडली. या घटनांमध्ये दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत.रत्नमाला शरद साबळे (वय 38, रा. वांबोरी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी मुरलीधर साबळे (रा. वांबोरी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतजमिनीतील सामाईक विहिरीजवळील स्टार्टर बोर्ड बॉक्स काढण्याच्या कारणावरून शिवाजीने फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या पतीला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली. माझ्या नादी लागलात तर बघून घेईन, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दुसऱ्या घटनेत शिवाजी मुरलीधर साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद मुरलीधर साबळे, गोविंद मुरलीधर साबळे, रत्नमाला शरद साबळे (सर्व रा. समर्थनगर, वांबोरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातील कंपाऊंडचा सिमेंट पोल कोणीतरी तोडल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शरद साबळे आणि गोविंद साबळे यांना याबाबत विचारणा केली. यावरून वाद वाढत गेला आणि त्यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच रत्नमाला साबळे हिनेही मारहाण करत तुला संपवून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.