महादजी शिंदे विद्यालयाचा उपक्रम
श्रीगोंदा । नगर सहयाद्री
रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, श्रीगोंदा येथील विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांनी रक्षाबंधनाचा सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी भारतीय सीमारेषेवर तैनात असलेल्या वीर जवानांसाठी तब्बल ३,००० राख्या प्रेमाने तयार करून पाठवल्या. या उपक्रमातून ‘शिक्षणातून राष्ट्रसेवा’ या संकल्पनेचा प्रत्यय आला.
विद्यार्थिनींनी आपल्या हाताने आकर्षक राख्या तयार करत जवानांसाठी प्रेमळ शुभेच्छा संदेशही लिहिले. काही विद्यार्थिनींनी भावना व्यक्त करणारे संदेश सभागृहात वाचून दाखवत उपस्थितांचे मन जिंकले. यासोबत महिला शिक्षिकांनीही हाताने लिहिलेल्या पत्रांद्वारे जवानांप्रती आपला सन्मान व्यक्त केला. या उपक्रमाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील स्काऊट पथकाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी जगताप, पीटर रणसिंग, तसेच प्राचार्य दिलीप भुजबळ, उपप्राचार्य शहाजी एकाड, पर्यवेक्षिका सुनिता काकडे आदी उपस्थित होते. यशस्वी आयोजनासाठी चंद्रकला निक्रड, ईश्वर नवगिरे, समीर भिसे, संतोष मगर आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊट विभागप्रमुख विकास लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन झगडे यांनी व्यक्त केले.