पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील भाळवणी गावात एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (दि. १९ सप्टेंबर) रोजी सकाळी घडली. मृत तरुणाचे नाव सुरेश सिद्धार्थ चव्हाण (रा. कोरेगाव, जि. सातारा) असे असून, गेल्या काही महिन्यांपासून तो भाळवणीतील एका भेळ सेंटरमध्ये वेटर म्हणून कार्यरत होता.
सुरेश चव्हाण नवनाथ मंदिराजवळील हॉटेल मालकाच्या खोल्यांमध्ये आपल्या मित्रांसोबत राहत होता. दररोजप्रमाणे तो शुक्रवारी सकाळी नागेश्वर मंदिराजवळील केटीवर आंघोळीसाठी गेला होता. मात्र, त्यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो त्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह सुमारे एक तासानंतर स्मशानभूमीच्या केटीवर आढळून आला. घटनेनंतर स्थानिक तरुणांनी तात्काळ धाव घेत सुरेशला प्रवाहाच्या बाहेर काढले.
मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. पारनेर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती सहाय्यक फौजदार राजेंद्र डोंगरे यांनी दिली. सुरेश चव्हाण याच्या खिशात सापडलेल्या डायरीतील नोंदींवरून पोलिसांनी त्याच्या बहिणी व मेहुण्याशी संपर्क साधला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.