आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका
निघोज । नगर सहयाद्री:-
निघोज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आता या भागात निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद अळकुटी-निघोज गट ‘नागरिक मागासवर्ग प्रवर्ग’ आरक्षित झाल्यामुळे याठिकाणी सर्वसामान्य उमेदवारांनाही संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, दिवाळीनंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असली तरी दिवाळीतच प्रचाराचा जोर दिसून येणार आहे.
डॉ. भास्करराव शिरोळे विरुद्ध सचिन पाटील वराळ
महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. भास्करराव शिरोळे हे प्रबळ उमेदवार मानले जात असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व उबाठा गटाच्या युतीमुळे त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुतीकडून संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व डॉ. कोमलताई भंडारी यांची नावे चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामतीताई कवाद यांचाही इच्छुक उमेदवारांमध्ये समावेश आहे.
पंचायत समिती निवडणुकीतही रंगत
निघोज पंचायत समिती गण ‘सर्वसाधारण’ झाल्याने येथे अनेक दिग्गजांनी इच्छुकता दर्शवली आहे. माजी सरपंच ठकाराम लंके, माजी उपसभापती खंडूजी भुकन, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले, शिवबा संघटनेचे अनिल शेटे, युवा नेते रुपेश ढवण हे प्रमुख दावेदार आहेत. रुपेश ढवण यांनी याआधी लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांना साथ दिली होती, मात्र नंतर त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने आता ते अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांचा स्थानिक जनसंपर्क दांडगा असल्याने लढत चुरशीची ठरणार आहे.
महिला राखीव गणातही इच्छुकांची गर्दी
अळकुटी पंचायत समिती गण ‘महिला सर्वसाधारण’ आरक्षित असल्यामुळे येथे अर्चना पुंडे (महाविकास आघाडी), प्रमिला म्हस्के (अपक्ष) आणि जानवी उचाळे (महायुती) यांची नावे पुढे येत आहेत. येथील इच्छुकांची संख्या दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मधुकर उचाळे बजावणार किंगमेकरची भूमिका
या संपूर्ण भागात जिल्हा परिषद माजी सभापती मधुकर उचाळे यांचे वर्चस्व कायम आहे. ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरत नसले तरी त्यांच्या पाठिंब्याने कोणत्याही उमेदवाराची निवडणूक जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्याच्या राजकीय गणितात कोणाला उमेदवारी मिळणार हे मधुकर उचाळे यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याची चर्चा पसरली आहे.