पारनेर । नगर सहयाद्री:-
जवळे (ता.पारनेर) येथे पारनेर जवळे रस्त्यालगत असलेल्या सालके- आढाव या भरवस्तीत पाच बिबट्यांनी दर्शन दिल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याचा कुकडी पट्ट्यातील अनेक गावांत संचार वाढला आहे. डोंगराळ भागात दिसणाऱ्या बिबट्याने आता त्याची वेस ओलांडून बहुतांश गावांमध्ये झेप घेतली आहे.
मंगळवारी (ता.२०)रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजीराव सालके यांच्या कोंबड्यांच्या खुराड्याकडे बिबट्याने आपला मोर्चा वळवला.वस्तीवर असलेल्या माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.त्यानंतर रात्री अकरा,एक व तीन वाजता दोन पुर्ण वाढ झालेल्या व तीन बछड्यांनी अंगणातच ठाण मांडले.
गेल्या पाच दिवसांपासून या वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे.वनविभागाने याची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी, शिवाजीराव सालके, रामचंद्र सालके,दत्तात्रय आढाव,संभाजी आढाव, तानाजी आढाव, मच्छिंद्र सालके,गोरक सालके,सुधाकर सालके व ग्रामस्थांमधून होत आहे.
अद्यापपर्यंत या परिसरात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ला होण्याची घटना घडली नसली तरीही बिबट्याच्या मुक्त वावरामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याठिकाणी मोठी नागरी वस्ती आहे. त्यामुळे या बिबट्यांचा वनखात्याने पिंजरा लावून तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी जवळे ग्रामस्थांनी केली.