श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी आरक्षित केले आहे, मात्र त्यासाठी घोडच्या पाण्याला धक्का लावलेला नाही. साकळाईचा ४९५ कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे गेला आहे. महिनाभरात मान्यता मिळणार आहे. येत्या तीन महिन्यात निविदा प्रक्रिया व भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
कोरेगाव येथील एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली.विखे म्हणाले, चांगले काम करणाऱ्या अनेकांचा श्रीगोंदेकरांनी कार्यक्रम केला आहे, हे फक्त याच तालुक्यात घडते. मीही श्रीगोंद्यामुळे पराभूत झालो यात शंका नाही. पण, मी श्रीगोंदेकरांवर नाराज नाही. ही जनता सुज्ञ आहे. पण पुढाऱ्यांची मात्र कोणीच ‘गॅरंटी’ देऊ शकत नाही. माझा संपर्क तालुक्यातील पुढाऱ्यांसोबत राहिल्याने माझे वाटोळे झाले.
आपण ही चूक सुधारून थेट जनतेशी कनेक्टिव्हिटी वाढविणार आहे. खासदारकी नसल्याने मला फरक पडत नाही. मात्र एक चूक तालुक्याला मागे नेणार आहे, याचा विचार कोणी केला नाही, असा टोलाही विखे यांनी लगावला. स्वागत बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे यांनी केले. यावेळी माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, दिनकर पंदरकर, रमेश गिरमकर, सिद्धेश्वर देशमुख, शहाजी हिरवे, पुरुषोत्तम लगड, रामदास झेंडे उपस्थित होते.
डिंभे-माणिकडोह बोगदा आम्हीच करणार..
कर्जत, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या डिंभे-माणिकडोह बोगद्यावर खूप चर्चा चालू आहे. मात्र या बोगद्याच्या कामाचा शुभारंभजल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळातच होईल, अशी ग्वाही सुजय विखे पाटील यांनी दिली.
सगळ्यांचा हिशोब चुकता करू..
लोकसभा निवडणुकीत काहींनी सोबत राहून माझा घात केला, त्यांची यादी मी मनात तयार ठेवली आहे. भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.