Crime News: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री सीतामढी जिल्ह्यातील परिहार परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने खळबळ उडवली. गणेश पूजेच्या मंडपात झालेल्या जोरदार हाणामारीनंतर गोळीबार झाला. विशेष म्हणजे, या घटनेवेळी भाजपच्या महिला आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार रामनरेश यादव उपस्थित होते. सुदैवाने दोघेही या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, परिहारमधील बाबा ठाकूर मंदिर परिसरात रविवारी रात्री गणेश पूजेनिमित्त जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना काही वेळपूर्वी पूजा समितीतील सदस्यांमध्ये आणि काही स्थानिकांमध्ये वाद झाला होता, जो तत्काळ मिटवण्यात आला होता.
मात्र, कार्यक्रमानंतर आमदार गायत्री देवी, त्यांचे पती आणि पूजा समितीचे सचिव प्रीतम कुमार प्यारे मंडपातून बाहेर पडत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. मात्र, नंतर हल्लेखोरांनी मिळून प्रीतम कुमार यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे भांडण पूजा समितीतील सदस्य आणि काही अज्ञात व्यक्तींमध्ये झालं असून, गोळीबाराची चर्चा असली तरी मंडपात प्रत्यक्ष गोळी लागल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.