हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बिबट्याचा हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारे कर्जुने परिसरात संचार असून खारे कर्जुनेतील मुलीला घरासमोरुन उचलून नेले आहे. निंबळकमध्ये एक मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी आहे. पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. कोंबड्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावा, कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गोळ्या घाला या मागणीसाठी निंबळक गावात तसेच निंबळक बायपास चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे बाह्यवळण रस्त्यावर दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी निंबळक येथील दत्त मंदिर चौक, निंबळक बायपास चौकात सकाळी अकरा वाजता चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, अजय लामखडे, डॉ. दिलीप पवार, प्रियंका लामखडे, बी. डि. कोतकर, घनश्याम म्हस्के, नाना दिवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी उशिरापर्यंत रास्तारोको आंदोलन सुरुच होते.

बुधवार (दि.12) रोजी सायंकाळी खारेकर्जून येथे घरासमोर खेळत असलेल्या पाच वषय मुलीला बिबट्याने आईसमोरून उचलून नेले होते. रियंका सुनील पवार या मुलीचा मृतदेह मोठी शोध मोहीम राबविल्यानंतर गुरुवारी सापडला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तसेच बिबट्या जेरबंद होईपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची ही आक्रमक भूमिका घेतली होती.
सदर घटनेमुळे बिबट्याला पकडण्यासाठी खारेकर्जुने परिसरात विविध ठिकाणी सहा पिंजरे बसविण्यात आले आहेत. तसेच वन विभागाची विशेष टीम व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून बिबट्याची शोध मोहीम राबवत आहेत. त्यातच याच परिसरात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी निंबळक परिसरातील वैष्णवमाता मंदिरा शेजारी असणाऱ्या कोतकर वस्तीवरील राजवीर रामकिसन कोतकर (वय 8) या मुलावर बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसात दोन चिमुकल्यांवर हल्ला करण्यात आल्याने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

राजवीरने आरडाओरडा करत केली स्वतःची सुटका
कोतकर वस्तीवर राजवीर बाहेर खेळत होता.त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जबड्यात धरून पळ काढला. बिबट्याने त्याची मान आपल्या जबड्यात पकडली होती. तशा अवस्थेत राजवीरने आरडाओरडा करत स्वतःची सुटका करून घेतली. रक्तबंबाळ घाबरलेल्या अवस्थेत राजवीर घरी आला. रक्तबंबाळ राजवीरला पाहून घरातील लोक पूर्ण हादरून गेले होते. त्यांनी त्याला तात्काळ नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजवीरच्या मानेला तसेच शरीराच्या इतर काही भागावर बिबट्याच्या दाताचे व पंजाच्या नखांचे ओरखाडे आहेत. राजवीरची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदर घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा – उद्योजक माधवराव लामखडे
तीन दिवसांपासून खारेकर्जुने, निंबळक, इसळक परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे निंबळक, खारे कर्जुने, इसळक तसेच परिसरातील ग्रामस्थ बिबट्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. बिबट्यांकडून चिमुकल्यांवर हल्ल्याच्या घटना या दुर्दैवी आहेत. जेऊर, चास, हिंगणगाव परिसरातील नागरिकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील नागरिक प्रचंड दहशतीलखाली आहेत. बिबट्या दिसला की नागरिक वनविभागला संपर्क करतात. बिबट्या दिसल्यानंतर तात्काळ ठार मारणे गरजेचे आहे. वन विभागाच्या अधिकार्यांनी, पथकाने, पोलिसांनी बिबट्याला ठार मारावे असे उद्योजक माधवराव लामखडे यांनी सांगितले.
बिबट्याला ठार मारण्याच्या परवानगीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे: डॉ. दिलीप पवार
दोन-तीन दिवसांपासून निंबळक, खारेकर्जुने परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी बाह्यवळण रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. बिबट्याला ठार मारण्याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, वनविभागाच्यावतीने बिबट्याला ठार मारण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविणयात आला असल्याची माहिती दिली. परंतु, बिबट्याला ठार मारण्याच्या परवानगीबाबत लेखी आश्वासन देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. वन विभागाच्यावतीने शनिवारी संध्याकाळपर्यंत बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळेल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिली.



