जालना / नगर सह्याद्री
Manoj Jarange Patil March: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.
मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत. अंतरावाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील सकाळी 10 वाजता मुंबईसाठी रवाना झाले. अनेक गाड्या, दुचाकीसह जरांगेंच्या मोर्चात मराठा सामील झाले होते. संयमाने आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो शिलेदारांसह जरांगे पाटील आज मुंबईकडे निघाले.
खा. संजय जाधव, संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा
बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ जरांगे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. त्याशिवाय आपण मुंबईपर्यंत तुमच्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार म्हणून मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्यासोबत बोलणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना म्हंटले आहे. संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील आमदार आहेत. त्यांनी पहिल्यापासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आताही आमदार संदीप क्षीरसागर हे मनोज जरांगे यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
पोलिसांकडून जालना-मुंबई मोर्चाला परवानगी; पण 40 अटी
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा विडा उचलला आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील अंतरवाली सराटी येथून सकाळी मराठा मोर्चानं मुंबईकडे कूच केला आहे. मात्र, जरांगे यांना जालना पोलिसांनी अटींसह परवानगी दिली असून, एकूण 40 अटींचे त्यांना पत्र देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. पुढील 2 आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही आंदोलन करता येणार नाही आहे, असे थेट निर्देश उच्च न्यायालयानं दिले. त्यामुळे जरांगे पाटलांची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील विनोद पोखरकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर न्यायालय आम्हाला आंदोलन करण्यास परवानगी देईल, असं पोखरकर म्हणाले. जरांगे पाटलांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेनं वळवला खरा, पण पुढील तासांत काय घडतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी काही अटी शतसह परवानगी दिली आहे. जालना पोलिसांकडून जरांगे पाटलांना 40 अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे.
जालना पोलिसांच्या महत्वाच्या अटी:
प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होऊ नयेत.
मोर्चाचा मार्ग जाहीर केल्याप्रमाणेच राहील, नंतर बदलता येणार नाही.
अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आदी सेवांना अडथळा निर्माण होणार नाही.
मोर्चादरम्यान सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई आयोजकांकडून होईल.
नागरिकांनी हातात कोणतेही शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज किंवा ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत. यासह एकूण प्रमुख 40 अटी.
सरकारचे प्रतिनिधी निघाले, जरांगेंची भेट घेणार
मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच चालू केले आहे. यावेळी भगवे झेंडे घेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या जात आहेत. जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आलेच तर मोठी अडचण होऊ शकते, असे राज्य सरकारला वाटत आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सरकारने मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत या दोन नेत्यांना जरांगे यांची भेट घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते जरांगेंची घेणार असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येऊन आंदोलन करू नये, अशी विनंती ते करणार आहेत.
सरकारचा नेमका प्रस्ताव काय?
मिळालेल्या माहितीनुसार ही भेट अहिल्यानगर किंवा पुण्यात होणार आहे. जरांगे यांनी मुंबईत सध्या आंदोलन करू नये हा संदेश घेऊन हे दोन्ही नेते जरांगे यांना भेटणार आहेत. उदय सामंत थोड्याच वेळात अहिल्यानगरमध्ये पोहोचणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता विखे पाटील, उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतल्यावर या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? सरकारतर्फे नेमका काय प्रस्ताव ठेवला जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशांनंतरही मनोज जरांगे पाटील आज आंतरवलीतून मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “देवेंद्र फडणवीसांना चूक झाकायचीये, म्हणून ते देवदेवतांना पुढे करत आहेत. त्यांना सांगून चार महिने झाले. आता देवदेवतांना पुढे करून त्यांच्याआडून गरीब मराठ्यांवर अन्याय केला जात आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “न्यायायलयाने आंदोलनाला तसा नकार दिलेला नाही. त्यांनी अचानक या दोन-चार दिवसांत नवीन कायदा काढलाय. त्याची तारीख २७ ऑगस्ट आहे. इतर कुठल्याच बाबतीत त्यांना आपल्याला बोलायला जागा नाही. कारण सगळ्या कार्यालयात आपण रीतसर लेखी निवेदनं सादर केली आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना कुठेच अडवता येत नाहीये. त्यामुळे त्यांनी अचानक हा कायदा आणला आहे. २०२५ चा तो कायदा आहे. त्यानुसार परवानगी घेतली नाही असं म्हटलंय”, असं मनोज जरांगे म्हणाले.
सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचा युक्तिवाद
दरम्यान, राज्य सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेतच युक्तिवाद केला आहे. “तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. आमच्या वकिलाला माहिती नाही. तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहितीच नाही. आम्हाला निघायच्या वेळेला सांगतात की अमुक अमुक याचिका दाखल केली आहे. याचिकाही नेमकी कालच केली त्यांनी. आधी सांगायला हवं होतं. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आमचीही बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसांचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकालही लावून घेतला. असं कसं होऊ शकतं?” असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला आहे.
“ही लोकशाही राहिलेली नाही. इंग्रजांच्या काळातही उपोषणं रोखली गेली नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात ते होतंय. आणि मग पुन्हा म्हणतात की आम्ही बोलतो. आम्हाला निकाल काल तीन वाजता आला. आज आम्ही निघणार होतो. एका रात्रीत आम्ही काय करायचं? देवाच्या नावाखाली, गणेशोत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीसांनी डाव साधला. अचानक याचिका दाखल केली. लोक त्यांचे, म्हणणं मांडणारेही त्यांचेच आणि लगेच निकालही लावून घेतला. आम्हाला माहिती आहे की न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आणि न्यायही देणार. कारण आम्हाला आधाराला तेवढीच जागा आहे. आमचेही वकील तिथे आमची बाजू मांडतील. गेल्यावेळीही न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला होता”, असा आशावाद जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
“मध्यरात्रीपर्यंत विभागच शोधत होतो”
दरम्यान, सरकारने ज्या कायद्याचं कारण परवानगी नाकारण्यासाठी पुढे केलं आहे, त्याच्यासाठीचा विभागच सापडत नव्हता, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. “या नवीन कायद्याचा विभागही सापडत नव्हता. रात्री १२-१ वाजले तो विभाग सापडायला. एवढा कायदा केला. त्यात काहीतरी सांगायचं ना की अमुक ठिकाणी जा आणि अर्ज करा. फक्त म्हणतात अर्ज सादर करा. पण करायचा कुठे? रात्री १-२ वाजता तो विभाग सापडला. न्यायालयाने सांगितलं की तुम्ही अर्ज करा आणि परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवणार. म्हणजे पुन्हा देवेंद्र फडणवीसच तिथे असणार”, असंही मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी
मराठा आंदोलनाकांसाठी एक मोठी बातमी असून मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. ही परवानगी सध्या केवळ एका दिवसासाठी असून त्यामध्ये काही अटीशर्थीही घालण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे यांनी या आधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना काही अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मनोज जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
एका दिवसात मागण्या मान्य करा, जरांगेंची मागणी
एका दिवसात जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत असेल तर त्यांच्या अटी आम्हाला मान्य आहेत. आम्हाला जर एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली तर सरकारने एका दिवसात आरक्षण द्यावं. पण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही उठणार नाही.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी अटीशर्थी नेमक्या काय?
१) नियम क. ४ (६) (च) नमुद आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.’
२) नियम क. ५ नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कीग करीता नेण्यात यावीत.
३) नियम क. ६ मध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठया संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे, त्यांचा आंदोलनाचा हक्क सुध्दा बाधित करता येणार नाही, त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचा सुध्दा समावेश असेल, त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
४) नियम क. ७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.
५) नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
६) नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
७) नियम क. ११ (ज) नुसार सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर-कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतर सुध्दा नियम नमुद केलेले आहेत.
८) नियम क. ४ (ग) मध्ये आम्हांस असलेल्या अधिकारान्वये आपणांस सूचित करण्यात येत आहे की, आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार श्री. गणेश विर्सजन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपले आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.