Maharashtra Crime: विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वाद तसेच चारित्र्यावर संशय घेत त्याने शर्मिला शिंदे (वय ३५, सध्या रा. महालक्ष्मी पार्क, हरीओमनगर परिसर) यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला केला होता. संशयिताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शर्मिला शिंदे या उद्योग भवनमध्ये लिपिक पदावर काम करतात. त्या मूळच्या इस्लामपूरच्या असून, त्यांचा अमरसिंग शिंदेसोबत प्रेमविवाह झाला होता; परंतु गेले काही महिने दोघांत वारंवार वाद होत होते. तसेच अमरसिंगही चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्यामुळे शर्मिला यांनी त्याच्यापासून विभक्त होण्यासाठी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दिला होता.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ड्यूटी संपवून त्या अंबाई टॅंक परिसरातून महालक्ष्मी पार्ककडे निघाल्या असताना संशयित अमरसिंगने त्यांना अडवले. दोघांत वादावादी होऊन अमरसिंगने सोबत आणलेला शॉकॉबसर शर्मिला यांच्या डोक्यात घातला. त्या जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून तो पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांनी शर्मिला यांना उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.