मुंबई । नगर सहयाद्री:-
हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जैद खान ) आणि त्याचा सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (वय ३२) या दोघांना ठाणे पोलिसांनी (Thane Police) अटक केली आहे. त्यांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एजाज हा कारमधून पळून जात असताना पोलिसांनी पाच किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांनी लखनौमध्ये एका कॉल सेंटरवर छापा टाकला होता.‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवर बनावट आयडी बनवून या भामट्याने मुंब्राभागातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून त्याने तिच्या बँक खात्यातून तब्बल १३ लाख ५४ हजार ९८१ रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस पथकाने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून ईमेल आयडीआणि तक्रारदार तरुणीची माहिती मिळवली. त्याआधारे ९ जानेवारी रोजी भोपाळमधून जैद खानला अटक करण्यात आली. जैदच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लखनौमध्ये एका कॉल सेंटरवर वेशांतर करून सापळा लावला आणि एजाजला अटक केली.
या भामट्यांनी तब्बल अडीच हजार चौरस फुटांचे कॉल सेंटर थाटले होते. या कॉल सेंटरमधील मुले-मुली प्रसंगी अश्लील व्हिडिओ दाखवून हेरत असत. त्यानंतर गिफ्ट पाठवल्याचे भासवून त्या गिफ्टसाठी कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळत. काही प्रकरणांमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊनही पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.