अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर तालुक्यातील एका गावात एका शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या आईने रविवारी (9 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावातील विद्यालयात व 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता गावातील अंगणवाडीजवळ ही घटना घडली. त्याच गावातील एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडिल व आणखी एका व्यक्तीविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या 13 वर्षीय मुलीचा तिच्या वर्गातील अल्पवयीन मुलाने छेड काढून विनयभंग केला. वर्गात बसलेली असताना त्याने तिला मला तू खूप आवडते, असे सांगून तिच्या शरीराला स्पर्श केला आणि मोठमोठ्याने हसत तिला लज्जास्पद वागणूक दिली.
तसेच, 8 फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी मुलाचे वडिल व आणखी एका व्यक्तीने गावातील अंगणवाडीजवळ विद्यार्थिनीला अडवले. तिचे केस धरून मारहाण केली, तोंडावर चापटी मारली आणि धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार इंगळे करत आहेत.