अहमदनगर । नगर सहयाद्री
किराणा दुकानातून घरी परत जाणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीची रस्त्यात छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरातील नालेगाव परिसरात घडला. याप्रकरणी पीडित तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल देठे (पूर्ण नाव नाही, रा. वारूळाचा मारूती, नालेगाव) याच्याविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीक माहिती अशी: फिर्यादी व फिर्यादीची अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास किराणा दुकानातून परत येत असताना त्याच्या ओळखीचा राहुल देठे हा त्याच्या दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या अल्पवयीन मुलीला थांबवले. फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला चिठ्ठीवर त्याचा मोबाईल नंबर देण्याचा प्रयत्न केला. मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा मोबाईल नंबर मागितला. पीडित मुलीने त्याला विरोध केला असता त्याने केस धरून ओढले व जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान या घटनेबाबत फिर्यादीची आई व फिर्यादी यांनी राहुलला जाब विचारला असता त्यांना त्याने तलवारीने मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.