नवी दिल्ली | वृत्तसंस्था
दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता दिल्ली हायकोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा मेल दिल्ली पोलिसांना आला होता. या धमकीनंतर दिल्ली हायकोर्ट रिकामे करण्यात आले आह. त्याचसोबत हायकोर्टाचा परिसर देखील तात्काळ रिकामा करण्यात आला आहे.
दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. हायकोर्टाच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हायकोर्टाच्या न्यायाधिश आणि वकिलांसह सर्व जणांना परिसरातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला. दिल्ली पोलिस आणि बॉम्ब निकामी करण्यासाठी पथके
दिल्ली हायकोर्टात दाखल झाली आहेत.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पोलिसांना मेलद्वारे दिल्ली हायकोर्ट बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी दिली आहे.
दिल्ली हायकोर्टाच्या ३ न्यायालयीन खोल्यांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. रात्री ११ वाजताच्या सुमारास माहिती हा धमकीचा मेल आला. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांनी २ वाजेपर्यंत हायकोर्ट रिकामे करण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर हायकोर्टात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.
दिल्लीपाठोपाठ मुंबईतही धमकी
राजधानी दिल्लीतील हायकोर्टानंतर मुंबईतील हायकोर्टही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल मिळताच हायकोर्टात पोलीस दाखल झाले आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी कऱण्यात येत आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ मुंबईतील हायकोर्टात असणार्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळताच कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू असून परिसर रिकामा करण्यात आला आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. बॉम्बे हायकोर्टाला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.