शिर्डी । नगर सहयाद्री:-
शहरातील लक्ष्मीनगर परिसरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वागत बॅनर फाडून तीन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तासाभरात छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात ज्या व्यक्तीने फिर्याद दिली होती, तोच मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी फिर्यादीसह एकूण चार आरोपींना अटक केली आहे.
लक्ष्मीनगर परिसरात गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी नगरसेवक आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांचे फोटो असलेले शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हे दोन बॅनर फाडले. तसेच परिसरात उभ्या असलेल्या तीन मोटरसायकलची तोडफोड केली.
एका मोटरसायकलमधील बॅटरीही चोरण्यात आली होती.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी विशाल राजेश अहिरे (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासाची चक्रे वेगाने फिरवताच पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कर्मचारी संदिप उदावंत, बाळासाहेब गोराणे, केवल राजपूत, शेकडे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे तणावपूर्ण वातावरण निवळले असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
गुन्हेगार दुसरे-तिसरे कोणी नसून, खुद्द फिर्यादी विशाल अहिरे हाच त्याच्या साथीदारांसह या कृत्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी विशाल राजेश अहिरे याच्यासह दिनेश दवेश गोफने, राकेश सोमनाथ शिलावट (सर्व रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. आपापसातील भांडणातून हे कृत्य केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. फिर्यादीच आरोपी निघाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.