अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
प्रवासी वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कडक नियमावली लागू केली आहे. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवणारा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर येथे समोर आला आहे.अहिल्यानगरहून भिंवंडीला जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसवरील चालक आणि वाहक यांनी ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून भरधाव बस मार्गस्थ केली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी नेप्ती (ता. अहिल्यानगर) परिसरात बस थांबवून टोल फ्री क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केली.
हा प्रकार 12 जून रोजी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडला. तारकपुर आगाराचे वाहतूक नियंत्रक भिमराज रामभाऊ ढगे (वय 52, रा. वाळकी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चालक किरण गोविंद केकान आणि वाहक सोमेश्वर जगन्नाथ रोडे (दोघे रा. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी रात्री 9.30 वाजता तारकपुर स्थानकावरून एमएच-20 बीएल-3138 क्रमांकाची बस भिंवंडी मार्गावर रवाना झाली होती.बसने काही अंतर कापल्यानंतर प्रवाशांनी बस थांबवून मद्यप्राशनाबाबत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली. या माहितीवरून ढगे यांनी वर्कशॉपचे कर्मचारी सय्यद मुज्जामीन यांना सोबत घेऊन नेप्ती शिवारात धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर बस रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून आली.
चालक-वाहक हे मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले.–प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ दुसऱ्या बसची व्यवस्था करून पुढील प्रवास सुनिश्चित करण्यात आला. यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एस.टी. प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी होत आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.