सातारा / नगर सह्याद्री –
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा महिला डॉक्टरच्या रहस्यमय मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी मुख्य संशयित म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर डॉक्टर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
सध्या पोलीस कोठडीत असलेल्या या दोघांची कसून चौकशी सुरू असून, प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालाने डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण, संशयितांशी असलेले संबंध आणि तळहातावर लिहिलेल्या संदेशाचे हस्ताक्षरहे तीन प्रमुख गूढ अद्याप उलगडलेले नाहीत. पोलीस या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवालात नेमके काय आढळले?
फलटण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल पोलीसांना प्राप्त झाला. अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळफास लावून आत्महत्या केल्यामुळेच झाला आहे. शरीराच्या मानेवर गळफासाच्या खुणा आढळल्या असून, त्याशिवाय शरीराच्या इतर कोणत्याही भागावर मारहाण, जखम किंवा बाह्य आघाताचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
या निष्कर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये पसरलेल्या महिला डॉक्टरचा खून झाला आहे’ या दाव्यांना मोठा धक्का बसला आहे. डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला आत्महत्या नसून हत्येची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी संशयित पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. मात्र, वैद्यकीय पुराव्यांनी आत्महत्येची पुष्टी झाल्याने आता तपासाची दिशा आत्महत्येस प्रवृत्त करण्याकडे वळली आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
शवविच्छेदन अहवालाने मृत्यूचे तांत्रिक कारण स्पष्ट केले असले तरी डॉक्टर महिलेला आत्महत्येसाठी का प्रवृत्त करण्यात आले? हा सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलीस तपासात आत्महत्येपूर्वी तिच्या मानसिक स्थितीबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
– तिने आत्महत्या का केली?
– तिच्या आयुष्यात कोणत्या समस्या होत्या?
– तिला धमकी देण्यात आली होती का?
– की तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला होता?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे पोलीसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तिचा मोबाईल फोन, चॅट हिस्ट्री, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया खाती तपासली जात आहेत, पण अद्याप कोणतेही निर्णायक पुरावे मिळालेले नाहीत.
तळहातावरील हस्ताक्षराचे रहस्य
प्रकरणातील सर्वात मोठे गूढ म्हणजे महिला डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला सात ओळींचा संदेश. या संदेशात बदने आणि बनकर यांची नावे नमूद होती.मात्र, हे हस्ताक्षर डॉक्टर महिलेचे नसल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हस्ताक्षराची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्याचा अहवाल अद्याप पोलीसांना मिळालेला नाही. त्यामुळे हस्ताक्षराच्या सत्यतेचे गूढ कायम आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे हे पोलीस दलासमोरील मोठे आव्हान आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
डॉक्टर तरुणी अन् प्रशांत बनकर रिलेशनशिपमध्ये होते, पोलीस तपासात धक्कादायक माहिती
फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर तरुणी आणि आरोपी प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले आणि नातं पुन्हा जुळलं. मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
तपासात असे उघड झाले आहे की, डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि प्रशांत तिच्याशी संपर्क टाळू लागला. दोघांमध्ये झालेल्या फोन कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसचे रेकॉर्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रशांत बनकर हा डॉक्टर तरुणी राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे.
प्रशांत बनकर, गोपाळ बदनेला अटक
तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या महिन्यात प्रशांतला डेंग्यू झाला होता. त्या काळात डॉक्टर तरुणी त्याच्याशी पुन्हा संपर्कात आली आणि दोघांचे नाते पुन्हा एकदा जुळले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला अटक केली आहे. बदनेविरुद्ध डॉक्टर तरुणीच्या सुसाइड नोटमध्ये चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
महिला आयोगाकडून आढावा
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज पाठवला होता. मात्र, उपनिरीक्षक बदने याच्याशी तिचा संपर्क सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. चाकणकर यांनी पुढे सांगितले की, मृत डॉक्टर आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्यात काही मतभेद होते. रुग्णालयातील तक्रार निवारण समिती आणि पोलिस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यातून डॉक्टरच्या बदलीची शिफारस झाली होती, मात्र त्यांनी तीन वेळा बदली नाकारली. त्यामुळे विशेष नियुक्तीद्वारे त्यांना फलटणमध्येच ठेवण्यात आले, असे त्यांनी म्हटले.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी वाद
तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो व्यवस्थित न आल्याने झालेल्या वादानंतर डॉक्टर घरातून बाहेर पडल्या आणि जवळच्या देवळात गेल्या. त्यानंतर बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले. यानंतर त्या एका हॉटेलवर गेल्या आणि आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवला, मात्र त्याचा फोन त्या वेळी बंद होता. आत्महत्येपूर्वीच्या या मेसेजमधून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.



