अकोला / नगर सह्याद्री –
अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केली. अकोल्यातल्या अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीतील राजू नगर भागात ही घटना घडली.. शेख शमिम शेख राजू असं मृत पत्नीच नाव आहे, तर शेख राजू शेख निजाम असं मारेकरी पतीच नाव आहे. या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अकोट फैल भागातल्या राजू नगर मधील शेख राजू हा रहिवासी आहे. शेख राजू आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज चारित्र्याच्या संशयावरून वाद व्हायचा. शेख राजू हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता, त्यामुळे तो त्याच्या पत्नीला सतत मारहाण आणि तिच्याशी वाद घालायचा. आज देखील सकाळी १० च्या सुमारास शेख राजू याने चारित्राच्या संशयावरूनच वाद घातला. भांडण सुरू असतानाच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली, शेख राजू याचा राग अनावर झाला आणि चाकूने तिच्या गळ्यावर वार करत तिला कायमचं संपवलं.
मुलीसमोर आईची निर्गुण हत्या..
दरम्यान, शेख शमिम हिच्या हत्यावेळी तिची १४ वर्षीय मुलगी घरातच होती. वडील आईला मारत असल्याच पाहत तिने जोरात आराडाओरड करत घरातून बाहेर पळ काढला. त्यानंतर घरासमोर शेजारील लोक जमा झाले. थोड्या वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेख राजू याला अटक केली आहे.
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करणार आहेत. तर महिलेचा मृतदेह शव विच्छेदन वैद्यकीय तपासण्यासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. याप्रकरणी अधिक तपास अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनात एपीआय जनार्दन खंडेराव करीत आहेत.



