नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वरमध्ये मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये ३ ते ४ पत्रकार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरमध्ये वृत्तांकनासाठी जात असताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण करण्यात आली. स्वामी समर्थ केंद्रजवळील गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत. किरण ताजने, योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांना छत्री, काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात या सर्व जखमी पत्रकारांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला. पत्रकारांना अशी वागणूक तर पर्यटकांना काय वागणूक देणार? असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा. अतिशय कडक कारवाई झाली आहे. त्याठिकाणचे पोलिस काय करत आहे. त्यांना माहिती नाही का ही लोकं कोण आहेत? मीडियाची लोकं एकत्र होती म्हणून ही घटना बाहेर आली. जर एखादा एकटा व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत काय होईल. या घटनेची चौकशी झाली पाहिजे.’
‘पत्रकारांना त्रास होणार नाही. मी पोलिस आणि यंत्रणांशी बोलतो. पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. दादागिरी आणि मारामारी काय कामाची आहे. तुमच्या त्र्यंबकेश्वर गावाचे महत्व वाढवण्याचे काम मीडिया करत आहे. असं जर असेल तर कसं होईल. पोलिसांनी करावाई करावी. मनात आणले तर पोलिस कारवाई करू शकतात. या गावगुंडाचे पोलिस रेकॉर्ड तपासा. ज्यांनी त्यांना ही अथोरिटी दिली त्यांनाच जाब विचारावा लागेल की कुठल्या प्रकारची माणसं तुम्ही नेमली आहेत. पत्रकारांसोबत असे जर वागत असाल तर जगभरातील लोक येतात त्यांना काय वागणूक देणार. या प्रकरणआला पूर्णपणे न्याय देऊ.’