अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर येथील माळीवाडा बसस्थानकावरून श्रीगोंद्याला जाणार्या बसमध्ये बसत असताना आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी पळवून नेली अशी फिर्याद बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर येथील एका महिलेने (वय-४५ सध्या रा. रेल्वेस्थानक, अहिल्यानगर) कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे.
मी, माझी १५ वर्षीय मुलगी, भाऊ व भावजय आम्ही अहिल्यानगर येथे मजुरीचे काम करण्यासाठी आलो आहोत, असे कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत संबंधित महिलेने म्हटले आहे. गेल्या २८ डिसेंबर रोजी आम्हा चौघांनाही अक्षय वाळुंज (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) येथे शेतीकामासाठी घेऊन गेला. तेथे आम्ही दोन दिवस काम केले.
शौर्य दिनासाठी कोरेगाव भीमा येथे जायचे असल्याने आम्ही मजुरीचे पैसे घेऊन गेल्या ३१ डिसेंबर रोजी नगर रेल्वेस्थानक येथे परत आलो. परंतु कोरेगाव भीमाला जायाचे आमचा बेत रद्द झाला. त्यामुळे श्रीगोंद्याला परत कामावर जायाचे ठरवून आम्ही अक्षय वाळुंजला तसे कळविले. त्याने आम्हाला माळीवाडा बसस्थानकाला जाण्यासाठी रिक्षा करून दिली. त्या रिक्षाने आम्ही बसस्थानकावर आलो. श्रीगोंद्याच्या बसमध्ये बसत असतानाचा माझी मुलगी दिसली नाही. तेव्हा आम्ही तिचा परिसरात शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही. तेव्हा मी ही तक्रार करीत आहे असे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.