जामखेड / नगर सह्याद्री :
शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. वसतीगृहातीलच विद्यार्थ्यांमध्ये मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ नंतर परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने वसतीगृहाला भेट दिली आहे. मात्र, वसतीगृहाचे वरिष्ठ अधिकारी अद्याप पर्यंत फिरकले नाहीत.
याप्रकरणी जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती मार्फत चौकशी करण्यासाठी पथक वसतीगृहात दाखल झाले आहे. यामध्ये समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोंगटिवार यांनीही वसतीगृहाला भेट दिली आहे.
रॅगिंग म्हणजे नेमकं काय?
वसतिगृहात रॅगिंग म्हणजे कनिष्ठ विद्यार्थ्यांवर वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक त्रास देणे. यात छेडणे, अपमानित करणे, मारहाण करणे, जबरदस्तीने काम करणे आणि इतर अनेक प्रकारच्या अमानवीय कृत्यांचा समावेश होतो.
रॅगिंगचे प्रकार :
शारीरिक रॅगिंग : यामध्ये मारहाण, जबरदस्तीने कपडे काढणे, अश्लील कृत्ये करणे इत्यादींचा समावेश होतो.
मानसिक रॅगिंग : यामध्ये विद्यार्थ्यांना शिवीगाळणे, अपमानित करणे, त्यांना कामासाठी धमकावणे, मानसिक त्रास देणे इत्यादींचा समावेश होतो.
सामाजिक रॅगिंग : यामध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट परिस्थितीत सहभागी होण्यास भाग पाडणे, त्यांना वाईट प्रकारे वागणूक देणे, सामाजिकरित्या बहिष्कृत करणे इत्यादींचा समावेश होतो.
आर्थिक रॅगिंग : यामध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पैसे मागणं, खर्च भागवण्यासाठी दबाव आणणे इत्यादींचा समावेश होतो.