अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील कोठला, घासगल्ली येथे राहणार्या एका महिलेला मारहाण केल्याची घटना शनिवारी (29 मार्च) सायंकाळी घडली. गौसीया शेरू शेख (वय 24) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रज्जाक शेख, रूक्साना सय्यद, वसीम शेख, अक्कु शेख, आणि पप्पु शेख (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. कोठला, घासगल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी आणि वसीम शेख यांचे लहान मुलांच्या खेळण्यावरून 15 दिवसांपूर्वी वाद झाले होते, ते मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी करण्यात आला होता.
मात्र, शनिवारी सायंकाळी 4.30 वाजता, फिर्यादी या आपल्या घराबाहेर ओट्यावर बसल्या असताना, रज्जाक शेख याने त्यांना आपल्या घरामध्ये बोलावले. तेथे गेल्यानंतर आधीच उपस्थित असलेल्या रूक्साना सय्यद, वसीम शेख, अक्कु शेख आणि पप्पु शेख यांनी त्यांना घेरले. अचानक रज्जाक शेख याने फिर्यादीला हाताने मारहाण केली आणि तू माझ्या पत्नीला शिवीगाळ का केली? असे विचारले.
फिर्यादीने आपण कोणालाही शिवीगाळ केलेली नाही असे सांगितले असतानाही, रज्जाक शेख याने लोखंडी कोयत्याच्या लाकडी मुठीने त्यांच्या डोक्यावर मारले. या हल्ल्यात त्यांचे डोके फुटून जखमी झाल्या. त्या बाहेर ओरडत आल्यावर, संशयित आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली. तुझे आणि तुझ्या मुलीचे नाटक खूप झाले, आता तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.