श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार इसमांनी हल्ला करत जबरदस्तीने पैसे लुटल्याची घटना शनिवारी (६ जुलै) पहाटे घडली. श्रीगोंदा पोलिसांनी जलद कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिलिंद बाबासाहेब जोगदंड (वय ३९, रा. जातेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हे आपल्या दोन गायी व एका गोऱ्याची वाहतूक चिंचोली काळदात (ता. कर्जत) येथे सोडण्यासाठी जात असताना बावडी शिवारात अज्ञात चार इसमांनी त्यांना अडवले.
‘गायी कत्तलीसाठी नेत आहात’ असा बनाव करत त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत लुटल्याचा प्रकार घडला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना सदरचा गुन्हा अभिजीत पपन बिटके (रा. बिटकेवाडी) याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नितीन भोस, राहुल साबळे व शाहरुख शेख या तीन साथीदारांसह गुन्ह्या कल्याची कबुली दिली.
आरोपीकडून ४ लाख ५० हजार रुपयांची पांढरी मारुती सुझुकी स्विफ्ट कार, ६० हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकलसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आणि उपविभागीय अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सपोनी प्रभाकर निकम, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, महादेव कोहक, मनोज साखरे, संदीप आजबे, आजिनाथ जाधव, चालक शिर्के, शरद चोबे व मोबाईल सेलचे राहुल गुंड यांनी केली.