चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी
पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील अंदाजे 150 कोटी रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी साईटवरून गायब केल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. कारखाना बचाव समितीच्या मागणीनुसार पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांसह कारखान्याची पाहणी करत मशिनरी व पेट्रोल पंप गायब असल्याचा पंचनामा केला आहे. कारखाना बचाव समितीने सदर मुद्देमाल तातडीने जप्त करण्याची मागणी केली आहे.
पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर औरंगाबाद सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, ती जुलै महिन्यात उठवून याचिका फेटाळण्यात आली आणि तपासाला गती मिळाली. सध्या पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात असून, मूळ मुद्देमाल गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन सरकारी पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून, साईटवरील पेट्रोल पंप देखील गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या गुन्ह्याची एकूण व्याप्ती सुमारे 400 कोटी रुपये असून, राज्य सहकारी बँकेचे अधिकारी अनंत भुईभार, अनिल चव्हाण, तसेच क्रांती शुगर कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, पांडूरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकु नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले प्रमुख आरोपी आहेत. कारखाना बचाव समितीने सदर मुद्देमाल तातडीने जप्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली असून यावेळी समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.