अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेअर मार्केट व फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे १.४३ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जून महिन्यात ११.२० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र, तपासात फसवणुकीचा आकडा सुमारे दीड कोटींवर पोहचला आहे. दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
संदीप बाबुराव कोठुळे (वय ४३, रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्री शिवाजीनगर, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमंता बाझार (ओपीसी) प्रा.लि. कंपनीचे संचालक एच. आर. श्रीकांत आचार्य (रा. पाटील हाऊस, शुक्रवार पेठ, पुणे), धमेन्द्रसिंग सेगर (रा. बुधती होरांगाबाद, भोपाळ, मध्यप्रदेश), दिनेश योगेश भटनाकर (रा.प्लॅट नं. ४०२, अशोका हेरिटेज, विशालनगर, पिंपळे निलख, पुणे), साजीद शेख (रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आचार्य, भटनाकर व शेख यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी शेअर मार्केट व फॉरेक्स मार्केटचे सेमीनार आयोजित केले होते. यात फिर्यादी व यांना माहीती मिळाली. फिर्यादीचा विश्वाससंपादन करुन त्यांच्याकडून ११ लाख २० हजार रुपये गुंतवणुकीसाठी घेतले. त्यानंतर आरोपींनी श्रीमंता बाझार (ओपीसी) प्रा.लि. या कंपनीचे कार्यालयच बंद केले. फिर्यादीसह इतर काही गुंतवणुकदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत. तपासात त्यांनी इतर साक्षीदारांची माहिती घेतल्यावर फसवणुकीची रक्कम १.४३ कोटींवर पोहचली आहे. दरम्यान, या आरोपींवर इतरही फसवणुकीचे गुन्हे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.