कृषी विभागाच्या तपासणीत धक्कादायक वास्तव समोर | बोगस विम्याने शेतकरी अडचणीत
सुनील चोभे / नगर सह्याद्री –
जिल्ह्यात फळबाग नसतांनाही शेतकर्यांनी बोगस विमा उतरविला असल्याची धक्कादायक माहिती कृषी विभागाच्या तपासणीत समोर आली आहे. २ हजार ५५ ठिकाणी फळबागच नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने कृषी विभाग त्या शेतकर्यांबद्दल कोणती भूमिका घेतेय हे पाहणे महत्वाचे आहे.
हवामानात होत असलेल्या विविध बदलांमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. परिणामी दिवसेंदिवस शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती खालावत होती. हे टाळण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलत अवघ्या १ रुपयात विमा योजना राबवण्यात सुरुवात केली. या योजनेत शेतकर्यांना अवघा १ रुपया भरावा लागत होता तर उर्वरित रक्कम सरकार जमा करत आहे. तसेच विमा उतरवण्यात आलेल्या पिकांची पाहणी केली जात नसल्याने अनेकजण याचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरविण्यात आला असल्याचा प्रकार उघड केला असतानाच आता परत फळबाग नसतानाही २ हजार ५५ ठिकाणी फळबागा क्षेत्रावर बोगस विमा उतरविण्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिक विमा योजना शासन निर्णय ता. १२ जून २०२४ नुसार मृग व आंबिया बहार सन २०२४ – २५ व २०२५ – २६ या वर्षाकरिता राज्यात राबविण्यात येत आहे. मृग बहार २०२४ मध्ये राज्यात एकुण ७३ हजार ७७७ शेतकर्यांनी सहभाग नोंदविला असुन ५० हजार ४४३.८६ हे विमा क्षेत्र संरक्षित केलेले आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हयात १३ हजार ८५ अर्जदारांनी सहभाग नोंदविला असुन ७ हजार ५१५.२४ क्षेत्र विमा संरक्षित केलेले आहे.
मात्र कांद्याच्या बाबतीत आलेला अनुभव पाहता प्रधानसचिव (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत मागील तीन वर्षामध्ये आढळुन आलेल्या बोगस अर्जाची संख्या पहाता मृग बहार २०२४ मधील सर्ब सहभागी अर्जाची १०० टक्के क्षेत्रिय तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. कृषी आयुक्तालयाने सर्व जिल्हयांना मृग बहार २०२४ मधील क्षेत्रीय तपासणी करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुयात जात मृग बहार सन २०२४ मधील सहभागी शेतकर्यांच्या फळबागांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार ५५ ठिकाणी फळबागा नसताना देखील विमा उतरविल्याचे समोर आले आहे.