मुंबई / नगर सह्याद्री –
मुंबईच्या लालबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने धावत्या बेस्ट बसचं स्टेअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बसने रस्त्यावरून जात असलेल्या 9 जणांना चिरडलं. या थरारक घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
जखमींवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बसची ६६ नंबरची बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली. यावेळी एका मद्यधुंद प्रवाशाने क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.
वाद इतका विकोपाला गेला, की हा प्रवासी चालकाच्या कॅबिनमध्ये घुसला. त्याने थेट बसचे स्टेअरिंग खेचले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.