अहमदनगर / नगर सह्याद्री
नगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याच्या उद्देशाने डॉक्टर आणि त्यांच्या हॉस्पिटल मध्ये काम करणारा कामगार यांचे अपहरण केले. त्यांना घाबरविण्यासाठी बंदुकीतून गोळीबार केला अन नंतर आपल्यावरच गोळीबार झाल्याचा बनाव केल्याचा प्रकार बुधवारी (दि.१०) सायंकाळी माळीवाडा ते मार्केटयार्ड चौक रस्त्यावर एका दुकानात घडला. मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सखोल तपास करून हा बनाव उघडकीस आणला असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सिराज दौलत खान, त्याचा मुलगा मोईन खान व निसार (पूर्ण नाव माहित नाही) अशा तिघांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजेंद्र देविदास बहुधने (वय ३३, रा. छत्रपती संभाजी नगर)याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी बहुधने हा पूर्वी तारकपूर येथील डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या नवोदय हॉस्पिटल मध्ये कामाला होता. आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या हॉस्पिटल बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरुन सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा डॉक्टरांमुळेच आपल्यावर दाखल झाला असल्याचे म्हणत आरोपी सिराज खान हा डॉ. तुपेरे यांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळत होता.
आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून डॉक्टरांकडून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला. त्याने फिर्यादी बहुधने याला बुधवारी (दि.१०) सायंकाळी ५ च्या सुमारास तारकपूर बसस्थानकातून बळजबरीने त्याच्या इनोव्हा कारमध्ये बसवून डॉ. तुपेरे यांच्या नवोदय हॉस्पिटल मध्ये नेले तेथून डॉ.तुपेरे यांना घेवून दोघांना माळीवाडा ते मार्केटयार्ड चौक रस्त्यावर त्याच्या स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अॅन्ड बर्ड हाऊस येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी बहुधने यास मारहाण करुन सिराज खान याने बहुधने याच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली. तीच बंदूक राजेंद्र बहुधने यांच्या हातात देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ. प्रदीप तुपेरे यांना दम देऊन सांगितले की , पोलिस आल्यावर सांगायचे की राजेंद्र बहुधने यानेच माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबाराचा आरोप हा डॉक्टरांकडेच पूर्वी काम करणाऱ्या बहुधने याच्यावर जाईल आणि या सर्व प्रकारामुळे डॉक्टर घाबरुन आपल्याला पैसे देतील असं सिराज खान याला वाटले.
मात्र, ही घटना घडल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉ. प्रदीप तुपेरे यांनी सिराज खानने सांगितल्यानुसार पोलिसांनी जबाब देण्यास सुरुवात केली होती. मात्र, डॉ. प्रदीप तुपेरे जबाब देत असताना अनेक वेळा अडखळले आणि त्याच ठिकाणी पोलिसांना संशय बाळगला. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशीयतांची वेगवेगळ्या खोलीत घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनाव असून डॉ. तुपेरे आणि राजेंद्र बहुधने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आले.
दरम्यान, मुख्य आरोपी हा सिराज खान हाच असून त्याने डॉक्टर तुपेरे आणि बहुधने यांना धमकी देऊन पोलिसांसमोर वेगळा जबाब द्यायला सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळं रात्री उशिरा याप्रकरणी राजेंद्र बहुधने याच्या फिर्यादीनुसार सिराज खान, मोईन खान, निसार यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १४० (१), १०९ (१), ६१ (२)(अ), ३०८ (२) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.