अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. ते तब्बल आठ वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत.त्यांनी 40 वर्षे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले मात्र या निवडणुकीत महायुतीची जी लाट आली त्या लाटेत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.
सुजय विखे पाटील त्यांच्या विरोधात उभे राहिले असते तर निकाल वेगळा लागला असता मात्र खताळ यांच्या उमेदवारीमुळे थोरातांसमोर मोठे आव्हान नाही अशाच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. खरे तर बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले जात होते.
शरद पवार यांनी देखील बाळासाहेब थोरात यांना राज्यात मोठी जबाबदारी मिळायला हवी असे विधान केले होते. मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतानाही आणि थोरात यांच्यासाठी सहानुभूतीची लाट असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. या निकालामुळे मात्र सर्वत्र विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा बदला घेतला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संगमनेरात विखे पाटील आणि थोरात यांच्यामधील राजकीय संघर्ष टोकाला भिडला. सुजय विखे पाटील हे या मतदारसंघात चाचपणी करत असताना अन त्यानंतर प्रचारादरम्यानही येथे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीने जिल्ह्यातील वातावरण तापवले होते.
बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे उमेदवार होते. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने अमोल खताळ यांना तिकीट दिले होते. त्यांनी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात बाळासाहेब थोरात यांना मागे टाकले होते. संगमनेर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना ९९६४३ ईतकी मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना १११४९५ मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ विजयी झाले आहेत.