अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात शुक्रवार (दि.२०) संध्याकाळच्या सुमारास एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२०) रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय नेण्यात आला. सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.