अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगरमध्ये बँक कर्मचार्यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. श्रीरामनगर, पाईपलाईन रोड येथील रहिवासी आणि कॅनरा बँकेचे निवृत्त असिस्टंट मॅनेजर किशोर हिरामण बावीसकर (वय ६६) यांनी ए.यु. स्मॉल फायनान्स बँकेच्या एकविरा चौक शाखेतील कर्मचारी देवेश दिपककुमार वर्मा याच्याविरुद्ध १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बावीसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये पैशाच्या गरजेसाठी त्यांनी ए.यु. स्मॉल फायनान्स बँकेत १५ तोळे सोन्यावर गोल्ड लोन घेतले होते. यापैकी १२ तोळे सोने चार लोन खात्यांमधून परत घेतले, तर ३ तोळे बँकेत शिल्लक होते. २७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता देवेश वर्मा याने फोनवर बावीसकर यांना शिलाविहार रोडवरील सुनिल वडापाव येथे सोने देण्यास सांगितले. देवेशने आपल्या माणसाला पाठवल्याचे सांगितल्याने बावीसकर यांनी अनोळखी व्यक्तीकडे १२ तोळे सोने दिले.
देवेशने फोनवर ती व्यक्ती बँकेचा कर्मचारी असल्याचे खात्री दिली. मात्र, एक आठवडा उलटूनही लोन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बावीसकर यांनी देवेशशी संपर्क साधला. देवेशने सोने घेतल्याचे नाकारत उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वी बावीसकर यांनी तोफखाना पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पण देवेशने पोलिसांनाही सोने घेतले नसल्याचे सांगितले. यामुळे बावीसकर यांनी देवेश दिपककुमार वर्मा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलिसांनी तपास सुरू केला आहे.