अहमदनगर । नगर सहयाद्री:-
चौघांच्या टोळक्याने युवकाला जातीवाचक शिवीगाळ करून वस्तारा, कोयता व लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केले. रोहित रामदास जगधने (वय १९ रा. श्रीकृष्णनगर, एकनाथनगर, नेप्ती रस्ता, केडगाव) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संग्राम गिते (रा. शिवाजीनगर, केडगाव), अबुजर राजे (रा. लालानगर, केडगाव), अभी लाड (रा. एकनाथनगर, केडगाव) व एक अनोळखी यांच्याविरुध्द मारहाण, शस्र अधिनियम, अॅट्रॉसिटीकलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्या आहे. रोहित यांच्या आईने त्यांच्या मामाकडून ६८ हजार रूपये हात उसणे घेतले होते. ते पैसे देण्यासाठी रोहित रविवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी सात ते सातेसातच्या दरम्यान जात असताना लालानगर येथील पाण्याच्या टाकीजवळ संग्राम गिते व इतरांनी त्याला अडवले.
जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला. लाकडी दांडक्याच्या सहाय्याने मारहाण करून खिशातील ६८ हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी रोहित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.