अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील निघोज येथे गोवंश तस्करीप्रकरणीत आरोपींकडून जनावरांच्या गोठ्याला आग लावून जीवित आणि आर्थिक नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी जैनउद्दीन उसेन मदारी (वय 32), रिहान रोशन मदारी (वय 18), मस्तान मदारी, अल्ताफ मदारी व तौसिफ मदारी (रा. निघोज, ता. पारनेर) यांनी गाडी क्रमांक एमएच एजे 9220 मधून 9 वासरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच बजरंग दल पारनेर प्रखंडाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत गाडी अडवून वासरे वाचवली.
या प्रकाराचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी निलेश भुकन (वय 36) यांच्या मालकीच्या गोठ्याला मध्यरात्री आग लावली. या आगीत दोन बैल भाजून गंभीर जखमी झाले असून, पीडिताला जर तू मधे आलास तर तुलाही जिवंत जाळू अशी धमकी देण्यात आली. ही घटना अत्यंत गंभीर असून सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणारी आहे. नागरिकांकडून आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.