सोलापूर । नगर सहयाद्री
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी उसळत असल्याने राज्य सरकारने ही जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिलांवर सोपवली आहे. त्यानुसार या महिलांकडून अर्ज भरून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार कामही सुरू झालं. पण हे काम सुरू असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून घेत असताना एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून नारी दूत या ॲपवरून फॉर्म भरीत आहेत .सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगाव मधील अंगणवाडी क्रमांक 1 च्या सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटक आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
सुरेखा आतकरे सुरेखा आतकरे असे मयत अंगणवाडी सेविकांचे नाव आहे. आतकरे यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतकरे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुरेखा आतकरे यांच्यावर देगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.