Ahilyanagar Crime News:दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील एका विहिरीत बुधवारी (दि. १२) रोजी एका अनोळखी वीस वर्षीय युवकाचा मृतदेह अढळला. मृतदेहाला शीर, दोन्ही हात, एक पाय नसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दाणेवाडी येथील विठ्ठल दगड्डू मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे, व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, दाणेवाडी येथील एक वीस वर्षीय युवक बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. मात्र, या मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटलेली नाही.