अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बनावट परवान्यांच्या आधारे अवैध पणे बंदुका व काडतुसे जवळ बाळगणाऱ्या जम्मू काश्मीरचे रहिवासी असलेल्या ९ जणांच्या टोळीला नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पकडण्यात आले आहे. त्यांच्या कडून ९ बंदुका, ५८ काडतुसांसह ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे येथील दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजंस चे पथक आणि तोफखाना पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून या टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे येथील दक्षिणी कमान मिलिटरी इंटेलिजंसचे पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, जम्मू काश्मीर मधील रहिवाशी असलेले काही जण बनावट शस्र परवाने तयार करून त्या आधारे गावठी बनावटीच्या १२ बोअरच्या बंदुका खरेदी करून नगर सह महाराष्ट्रात विविध ठिकाणी खाजगी सुरक्षा एजन्सीमार्फत बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. ते शासनाची फसवणूक तर करत आहेतच शिवाय त्यांच्या पासून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका आहे. ही माहिती मिळाल्यावर सदर पथक नगरमध्ये आले. त्यांनी तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. संशयितांची नावे व ते कुठे काम करतात याची माहिती दिली. त्यानंतर मिलिटरी इंटेलिजंसचे पथक व पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत ठिकठिकाणी छापेमारी करत ९ जणांना ताब्यात घेतले.
त्यामध्ये शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर (वय ३८, रा.गणेश टेम्पींग नागापुर), महंमद सलीम उर्फ सार्लेम गुल महंमद (वय ३२, रा. गणेश टॅम्पींग नागापुर), महंमद सफराज नजीर हुसैन (वय २४, रा.कोहिनूर जिनींग घोगरगाव ता. श्रीगोंदा), जहांगिर झाकिर हुसैन (वय २८, गणेश टेम्पींग नागापुर), शाहबाज अहमद नजीर हुसैन (वय ३३, रा. अहमदनगर मर्चट बँक शाखेजवळ, श्रीगोंदा), सुरजित रमेशचंद्र सिंग (रा. अहमदनगर मर्चंट बैंक शाखेजवळ, सोनई, ता. नेवासा), अब्दुल रशिद चिडीया (वय ३८, रा. अहमदनगर मर्चट बैंक शाखा पुणे), तुफेल अहमद महंमद गाजीया (रा. पी.डी.सी. बैंक, मार्केटयार्ड स्वारगेट पुणे), शेर अहमद गुलाम हुसैन (रा. पुणे ) यांचा समावेश आहे. हे सर्व मुळचे जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
शब्बीर गुज्जर याने सन २०१५ मध्ये शेर अहमद गुलाम हुसैन याचेकडुन तारकपूर बस स्थानक परिसरात गावठी बनावटीचे १२ बोअर रायफल, बनावट लायसन्स व जिवंत राउंड विकत घेतले होते. तर इतरांनी जम्मु काश्मीर च्या राजौरी येथुन १२ बोअर रायफल, बनावट लायसन्स व जिवंत काडतुसे खरेदी केल्याचे तपासात समोर आले. या सर्वांकडे राजौरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सह्यांचे शस्र परवाने आढळून आले होते. त्याची खातरजमा केल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले. या सर्वांकडून ९ गावठी बनावटीचे १२ बोअर रायफल, ५८ जिवंत काडतुस, बनावट शस्त्र परवाने असा ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.