Varun Aaron Retirement: भारताचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे. वरुण आरोन आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. सुरुवातीला त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्यानंतर तो दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला. त्यानंतर त्याला कमबॅक करता आलं नाही. त्याला भारतीय संघाकडून १८ सामने खेळण्याची संधी मिळाली.
आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरुण आरोनने २०१-११ मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ताशी १५३ च्या गतीने चेंडू टाकला होता. वरुण आरोनला आपल्या क्रिकेट कारकिर्दीत चांगली सुरुवात मिळाली होती. त्याचे वेगवान उसळी घेऊन येणारे चेंडू खेळणं कुठल्याही फलंदाजासाठी मुळीच सोपं नव्हतं. मात्र दुखापतीने त्याची पाठ सोडली नाही.
त्याला २०११ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. त्याच्या कारिकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १८ सामन्यांमध्ये २९ गडी बाद केले होते. वरुण आरोनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.
त्याने पोस्ट शेअर करत लिहिले,’ गेल्या २० वर्षांपासून मी वेगवान गोलंदाज म्हणून जगलो. आज मी अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतोय. मी देव, कुटुंबातील सदस्य, मित्रांचे, सहकारी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. माझ्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक दुखापतींचा सामना करावा लागला.