अहमदनगर / नगर सह्याद्री –
Ahmadnagar Politics : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलच राजकारण तापलं आहे. ज्यांच्यावर काँग्रेसच्या हाय कमांडचा दृढ विश्वास तेच आता काँग्रेस सोडून भाजपात जात आहेत. आता नितेश राणेंच्या ट्विटनंतर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे.
खासदार सुजय विखे म्हणाले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही भाजपच्याच वाटेवर असल्याचं माझ्या कानावर आलं असून काही दिवसांपासून जे जे काँग्रेसचे जे कार्यक्रम झाले आहेत. त्या कार्यक्रमातील फ्लेक्सवर सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. वरील सर्व नेत्यांचे फोटोच गायब का झाले आहेत? याचं कारण म्हणजे माणूस दुसरीकडे जात आहे, किंवा फोटो टाकल्यानंतर निवडणुकीत पडणार असल्याची भीती आहे, अशी टोलेबाजी विखेंनी केली आहे.
काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वीच भाजपात गेले आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर अनेक काँग्रेसचे नेते भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अशोक चव्हाण वगळता काँग्रेसचा एकही नेता भाजपात गेला नाही. अशातच काल लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात बाळासाहेब थोरातांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. यावेळी बोलताना थोरातांनी विखे घराण्याचा संपूर्ण इतिहासच बाहेर काढत टीका केली होती. याच टीकेला खासदार सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसने अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. अनेकांनी काँग्रेसमधून इतर पक्षात उड्या मारल्या आहेत. 1978 सालापासून राज्यातील एका कुटुंबाने काँग्रेसमधून अनेकादा उड्या घेतल्या आहेत. त्यातील उदाहरण म्हणजे विखे घराणं. राधाकृष्ण विखे पाटलांनी अनेकदा काँग्रेस सोडून दिली आहे. मंत्रीपदे भोगली आहेत, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरातांनी केली होती.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आमदार रोहित पवारही सुजय विखे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आमचं घर फोडलं असल्याची टीका रोहित पवारांकडून नेहमीच केली जात आहे. त्यावरही सुजय विखेंनी शेरोशयरी करीत सडेतोड प्रत्यत्तर दिलं आहे. सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली ही म्हण रोहित पवारांवर लागू होणार असल्याची सडकून टीका सुजय विखे यांनी केली आहे.